नाशिक : सोन्याची पॉलीश केलेले बनावट दागिने गहाण ठेवत चौघा संशयितांनी २० लाखांचे कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोडच्या बिटको पॉर्इंटजवळील पथिक आर्केटडमध्ये मण्णपुरम् गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय असून सोने तारणावर कर्ज दिले जाते़ या फायनान्समध्ये संशयित मनोज चिंधू कुटे (रा. मंदिरासमोर, श्रमिकनगर, कॅनॉल रोड, जेल रोड), चंद्रशेखर शमार्नंद सिंग (फ्लॅट नंबर ६, जय गोपाल अपार्टमेंट, देवी चौक, रेल्वे स्टेशनजवळ, नाशिकरोड), शैजार रझाक शेख (रा. साईकिरण अपार्टमेंट, नागजी हॉस्पिटलजवळ, वडाळा रोड़) व हासन कमलोद्दीन शेख (रा. नाशिक) यांनी संगनमत करून मण्णपुरम गोल्ड लोनच्या बिटको शाखेत खाते उघडले.
६ नोव्हेंबर २०१७ ते २३ एप्रिल २०१८ या कालावधीत संशयितांनी मण्णपूरम् गोल्डमध्ये सोन्याचे पॉलिश केलेले बनावट दागिने कर्जासाठी तारण ठेवले़ तसेच या दागिण्यांवर २० लाख ४९ हजार ६४५ रुपयांचे कर्ज घेतले़ कर्जासाठी तारण दिलेले हे दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीचे गोकुळ नागराजन (२७, रा. जीवन पार्क सोसायटी, सायखेडा रोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या चौघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे़