नाशिक : म्हाडाच्या घरांची जाहिरात दाखवून या प्रकल्पात घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून सहा जणांची जवळपास २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित किशोर सरोदे (रा. पाथर्डी फाटा) याच्याविरोधाच इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन प्रभाकर भोळे (४६, रा. वडाळा गाव) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किशोर सरोदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी २०१९ ते १ मे २०२१ दरम्यान संशयित किशोर सरोदे याने म्हाडाचे घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीसह पाच जणांकडून २८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम घेतली. यात फिर्यादी नितीन भाळे यांच्याकडून ४ लाख ५० हजार, कल्पना भोळे यांच्याकडून ४ लाख ५० हजार, भावना कोल्हे यांच्याकडून ४ लाख ५० हजार, वंदना चौधरी यांच्याकडून ६ लाख, पुष्पा पवार यांच्याकडून ४ लाख २० हजार, तर गायत्री महाले यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र, त्यांना घर मिळवून दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन भोळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित किशोर सरोदे याच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उघडे तपास करीत आहेत.