पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील कांदा व्यापारी सुमित सुभाष समदडीया यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनीचा एकूण ५२९ गोण्यांतील सुमारे ६ लाख ३२ हजार ४६ रुपये किमतीचा कांदा संशयितांनी परस्पर विकला. संशयितांनी इतर व्यक्तींच्या नावावर असलेले सिमकार्ड व फोन वापरून तसेच ट्रान्स्पोर्ट मालक यांना फोन करून ट्रकला बनावट नंबरप्लेट लावली. कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एंटरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने त्यांना गाडीत भरून दिला असता कांदा ओडिसा येथे पोहोच न करता परस्पर अन्यत्र विक्री करून फसवणूक केली. या प्रकरणी समदडीया यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण एकनाथ अहिरे (रा. श्रीरामनगर, नाशिक), आशिष भिकन गांगुर्डे (रा. गणपतनगर, नाशिक), प्रेम अशोक खलसे (रा. इच्छामणीनगर, नाशिक), सादिक युसूफ पटेल (रा. संजयनगर, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे, पंकज ऊर्फ बंदी शिंदे, रा. आडगाव, जि. नाशिक) यांच्यासह पिंपळनेर (ता. साक्री) येथील इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्फो
दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश
पोलिसांनी संशयित प्रवीण अहिरे यला ताब्यात घेतले असता सादिक पटेल या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कांदा उतरून घेत कांदा सटाणा येथे विक्री केल्याचे उघड झाले. दरम्यान, संशयितांकडून ३० हजार रुपये रोख, ३ मोबाईल्स, १५ लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच १५ जीव्ही ८२२५), ३ लाख रुपये किमतीची इंडिगो कार (एमएच ०२ सीआर ६०३३) असा एकूण १८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन संशयित आशिष गांगुर्डे, प्रेम खलसे यांच्याकडे चौकशी करून त्यांना बाल न्याय मंडळात हजर राहण्याचे समन्स देत पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.