नाशिक : साक्री तालुक्यातील राइनपाडा येथे पाच निष्पाप भिक्षेकरी नाथपंथी डावरी गोसावी समाजाच्या तरुणांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी भटके विमुक्त भराडी समाज सेवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पेठरोडवरून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून गोल्फ क्लब मैदानावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राइनपाडा येथील हत्याकांडातील सामील आरोपींचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच वर्षानुवर्षे नाथपंथी डवरी गोसावी, भराडी समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिला असल्याने या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी एक हजार कोटींचे पॅकेज देण्यात यावे, समाजाच्या पुनर्वसनाची व संरक्षणाची जबाबदारी घेऊन प्रबोधनाची व्यवस्था शासनाने करावी, या समाजाच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षण कायदा लागू करावा, नाथपंथी महामंडळाची स्थापना करावी, समाजासाठी सहा नाथ भवन तसेच वसतिगृहे बांधण्यात यावी, समाजाच्या रुढी, चाली, परंपरा यांचे संवर्धन होण्यासाठी समाजाची जनगणना व त्यांचे संशोधन करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात बाळकृष्ण शेळके, बाळासाहेब कर्डक, राजू देसले यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
भराडी समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:04 AM