येवला : सायबर गुन्हेगारी करणारे ठकबाज विविध प्रकारचे हातखंडे वापरून नागरिकांना गंडवत असतात. प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजनेच्या नावाखाली फसवणूक सुरू असून या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.तालुक्यातील तळवाडे येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते शेतकरी संजय पगारे यांच्या मोबाइलवर प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजना असा संदेश काही दिवसांपूर्वी आला. ठराविक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर आपल्याला दोन लाखांचे कर्ज केवळ एक टक्का व्याज दराने मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. या बदल्यात पगारे यांच्याकडून दोन हजार रुपये फोनपेद्वारे मागणी करण्यात आली. पगारे यांनी जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. पाटील यांनी तातडीने तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.फसवणूक करणाऱ्यांवर येवला तालुका पोलिसात भा. द. वि. कलम ४२०, ४१९, ४१७, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ सी आणि डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करत आहेत.फसवणुकीचे विविध प्रकार सुरूकाही भागात प्रधानमंत्री योजना आधारकार्ड एक टक्का व्याजदराने कर्ज उपलब्ध असे सांगून लोन मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टीम दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये अशी रक्कम स्वतःच्या फोन पे खात्यावर मारून घेत आहे आणि शेतकऱ्याची फसवणूक करत आहे. प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजना या नावाने कोणतीही शासकीय योजना नसून केवळ फसवणुकीच्या उद्देशाने हे मेसेज पाठवले जात आहे. तरी अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी अथवा सायबर पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा ग्रामीण
प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजनेच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 11:09 PM