नाशिक : आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांचे फसवणुकीचे विविध कारनामे बाहेर येत आहेत़ संचालक श्रेयस राजेंद्र आढाव (रा़ निर्मल निकेतन, गंगापूर नाका) याने केवळ गुंतवूणकदारांची नव्हे, तर हॉटेल व्यवसायातील आपल्या भागीदाराची दीड कोटी रुपयांची, तर हॉटेल भाडेतत्त्वावर दिलेल्या महिलेकडून २० लाख रुपये घेऊन त्यांची फसवणकू केल्याचे समोर आले आहे़ गंगापूर रोडवरील हितेंद्र वानखेडे व जयश्री थोरात आणि भालचंद्र आघारकर यांची ही फसवणूक झाली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़ गंगापूर रोड परिसरातील रहिवासी हितेंद्र वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संशयित आढाव सोबत हॉटेल व्यवसायात भागीदारी होती़ २०१६ मध्ये त्र्यंबकरोडवरील बेलगाव ढगा येथील जागेवर हॉटेल स्वराजचे बांधकाम कर, चालव व मला महिन्याकाठी ठराविक रक्कम दे असे आढाव याने सांगितले़ त्यानुसार वानखेडे यांनी हॉटेलचे बांधकाम केले व भागीदारीचा करारनामाही केला़ मात्र हॉटेलचे काम पूर्ण झाल्यावर भांडण करून तुझे बांधकामाचे दीड कोटी रुपये परत करतो असे सांगितले मात्र एक रुपयाही परत न करता फसवणूक केली़संचालक आढाव याने या दोघांबरोबरच मालेगाव येथील भालचंद्र आघारकर यांच्याकडून २०१६ मध्ये साडेबारा लाख रुपये घेतले़ यानंतर पैसे परत करण्यासाठी चेकही दिला, मात्र बँकेस सांगून चेक स्टॉप केला़ संशयित आढाव याने केवळ या तिघांचीच नव्हे तर आणखीणही अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, या फसवणुकीबाबत लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले़हॉटेल चालविण्यास देण्यासाठी घेतले डिपॉझिटच्आढाव याने जयश्री पंजाबराव थोरात यांना ५० लाख रुपये डिपॉझिट सांगून हॉटेल स्वराज चालविण्यासाठी दिले़ त्यानुसार त्यांनी मार्च २०१७ मध्ये २० लाख रुपये दिले, तर उर्वरित ३० लाख रुपये बेक्वेट हॉल व इतर अर्धवट कामे पूर्ण केल्यानंतर देऊ असे सांगितले, त्यानुसार भाडेकरारही केला़ मात्र ही कामे न करताच उर्वरित ३० लाखांची मागणी आढाव करीत होते़ यास नकार दिल्याने त्यांनाही हॉटेल खाली करण्यास सांगितले़ यानंतर दोन-तीन दिवसांत चेकद्वारे पैसे परत करतो असे सांगून कॅन्सलेशन डीड केली मात्र चेक दिलाच नाही़ त्यांचे सुमारे सात ते आठ लाखांचे सामान आजही या ठिकाणी पडून आहे़
‘त्या’ गुन्ह्यातील फरार संशयित आढावकडून भागीदारांचीही फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:49 AM