मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्याच्या आईच्या नावे असलेल्या वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाभाडी गावचे तत्कालीन तलाठी व आर्मस्ट्रॉँग कंपनीचे संचालक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजी सीताराम पाटील या शेतकºयाने फिर्याद दिली आहे.या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडी शिवारातील गट क्र. १२०/७९९ या शेतजमिनीचा फिर्यादी पाटील यांच्या आई श्रीमती निंबाबाई सीताराम पाटील यांच्या नावे सातबारा उतारा आहे.३ ते २५ जुलै २०१४ दरम्यान दाभाडी तलाठी कार्यालयात तत्कालीन तलाठी पी.पी. मोरे व आर्मस्ट्रॉँग इन्फास्ट्रक्चर लि. साखर कारखान्याचे संचालक समीर भुजबळ यांनी संगनमत करुन कंपनीच्या हितासाठी फिर्यादी पाटील यांच्या आईच्या शेत गट क्र. १२०/७९९ च्या सातबारा उताºयावर एकाच महिन्यात केव्हा पडीत तर केव्हा पीकपेरा असा शेरा असलेले उतारे अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे सादर करीत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सरकारी कागदपत्रात फेरफार केला. दाभाडीचे तलाठी यांनी अधिकाराचा गैरवापर करुन एका विशिष्ट कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी पाटील यांची फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे हे करीत आहेत.
समीर भुजबळांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:49 AM