सिन्नर: कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींना सिन्नर शहर, तसेच उपनगरातील खासगी व शासकीय रुग्णालयातून संगमनेर नाका येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम विधीकरिता आणण्यासाठी येथे नि:शुल्क ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली.
संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत असून, त्या अनुषंगाने राज्य शासनाकडून विविध खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. सिन्नर नगरपरिषदनेही अडचणीच्या काळात नागरिकांना सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत या कारणाने मयत झालेल्या व्यक्तींना सिन्नर शहर, तसेच उपनगरातील खासगी व शासकीय रुग्णालयातून संगमनेर नाका येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम विधीकरिता आणण्यासाठी येथे ॲम्बुलन्स सोय उपलब्ध होत नसल्याने, संबंधितांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत असते. सदर बाब लक्षात घेत संगमनेर नाका स्मशानभूमी येथे मयत व्यक्तीस नेण्यासाठी सिन्नर नगरपरिषदेमार्फत ॲम्बुलन्सची सोय करण्यात यावी, अशी सूचना माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली होती. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, प्रमोद चोथवे व इतर सर्व नगरसेवकांनी यास सहमती दर्शविली आहे. गुरुवार (२९)पासून सिन्नर शहरातील गरजू लोकांनी याचा सेवेचा लाभ घेता येणार आहे. सदर ॲम्बुलन्सकरिता कुठल्याही प्रकारचे आर्थिक शुल्क देण्याची गरज नाही. मोफत रुग्णवाहिकेसाठी नागरिकांनी ९८२२४८०२००, ९६८९७७५८७१ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन नगराध्यक्ष डगळे यांनी केले आहे.