नाशिक : राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह संस्थेमार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधितांनी मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशाचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एकमेव शासकीय संस्था आहे. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेण्यात येणार असून, त्यानुसार निवड करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह संस्थेच्या अधीक्षकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. मोटार ॲण्ड आमेंचर रिवायंडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता किमान नववी पास तर वयोमर्यादा १६ ते ४० वर्षे असणे बंधनकारक आहे. या अभ्यासक्रमाचा प्रशिक्षण कालावधी ४ महिने असून, प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज अधीक्षक, शासकीय दिव्यांग प्रौढ शिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता. मिरज, जि. सांगली येथे पाठविण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.