नाशिक : पंचवटी अमरधाम येथे मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत करारनाम्यानुसार साहित्य पुरवठा होत नसल्याची तक्रार महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. दरम्यान, साहित्य पुरवठ्याबाबत नव्याने ठेका देण्यासंबंधी निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच सभापतींनी जुन्या मक्तेदारांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे जगदीश पाटील यांनी पंचवटी अमरधाममधील मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत साहित्य पुरवठ्याविषयी सुरू असलेला अनागोंदी कारभार निदर्शनास आणला. पाटील यांनी सांगितले, मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत करारनाम्यानुसार मक्तेदाराने पाच लिटर्स रॉकेल, एक पाटी गोवऱ्या, ८ मण लाकूड पुरविणे गरजेचे आहे. परंतु, प्रत्यक्ष पाहणीनंतर केवळ दीड ते दोनच लिटर्स रॉकेल पुरवठा केला जात असून, लाकूडफाटाही पार्थिवाच्या कमी-जास्त आकारावरून दिले जात आहे. एक पाटी गोवऱ्यांचा उल्लेख करारनाम्यात आहे, परंतु त्यात स्पष्टता नाही. पंचवटी अमरधाममधील मक्तेदाराने तर न्यायालयात जात आपल्यालाच कायमस्वरूपी ठेका देण्याचा दावा दाखल केलेला आहे. महापालिकेचे मक्तेदारांवर नियंत्रण नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. सदर मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा आणि लवकरात लवकर नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याची सूचनाही पाटील यांनी केली. यावेळी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर साहित्य पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. चौकशीत तथ्य आढळल्यास मक्तेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सभापतींनी सांगितले.