राजीव वडगे संगमेश्वरमालेगाव-मनमाड चौफुलीनजीकच्या मोहंमदिया तिब्बिया युनानी मेडिकल कॉलेज व अस्सायर रुग्णालय (मन्सुरा)ने विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देत असतानाच मालेगाव तालुक्यातील पाच गावे दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.१९८१ पासून युनानी पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण या महाविद्यालयातून दिले जात आहे. शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन डॉक्टर झाले आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय असणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अनुदानित हे महाविद्यालय आहे. दत्तक घेतलेल्या या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. येथील ग्रामस्थांमध्ये असलेले आजार, रोग, शिक्षण याची माहिती संकलित करण्यात आली. रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. त्यांची दर आठवड्याला आरोग्य तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात येतात. सदर गावांतील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी होते. एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, कंम्पाउंडर व दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थी डॉक्टर आदिचे पथक प्रत्येक गावात दर आठवड्याला जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच आरोग्यविषयक जनजागृती करतात. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना स्वयंस्वच्छतेचे धडे दिले जातात. महिलांना स्त्री डॉक्टरांमार्फत आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेची माहिती दिली जात आहे. या उपक्रमांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिकाही आता मदत करु लागले आहेत.हर्निया, अॅपेंडिक्स, मोतीबिंदूच्या अनेक रुग्णांना महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणून सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जात आहे. शिवाय रक्त, लघवी तपासणी, इसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी आदि तपासण्याही सवलतीच्या दरात होत असल्याने रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. स्त्रियांच्या स्तनांची कॅन्सर तपासणी करणारे, मॅमोग्राफी करणारी अद्ययावत यंत्रसामग्री मालेगाव परिसरात फक्त याच रुग्णालयातच उपलब्ध आहे. मन्सुरा संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अॅड. इस्माईल रोशनअली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजहर हसन, कॉलेजच्या मेडिकल कॅम्प कमिटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम आदिंचा उपक्रम राबविण्यात पुढाकार आहे.
पाच दत्तक गावांची मोफत आरोग्य सेवा
By admin | Published: July 19, 2016 12:47 AM