नाशिक, दि.31- महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. तसंच या भागातील एका फार्महाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतो. डावा कालव्याचा मळे परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आला असून, शेतकरीवर्गावर भीतीचे सावट पसरले आहे. गोदाकाठालगत बिबट्याचा वावर नवीन नसला तरी थेट मानवी वस्तीजवळ बिबट्या येणे हे मात्र धोक्याचे मानले जात आहे. गंगापूररोड-गिरणारे रस्त्यावरील महादेवपूर ते मखमलाबादजवळील गंगावाडी परिसर आणि पुढे थेट मेरीपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ वाढत आहे. वन्यजीव असलेला मार्जार कुळातील बिबट्याची अन्नसाखळी संपुष्टात आल्यामुळे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत संघर्ष करीत आहेत. त्याचा हा संघर्ष आता महादेवपूरपासून तर थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्यालगतही दिसू लागला आहे. या भागातील शेतकरी यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पशुधन तसेच मजुरांवर हल्ला करण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच बिबट्याचा वाढता संचार धोक्याचा मानला जात आहे. येथील मळे परिसरात शेतकरी व त्यांचे शेतमजुरांची घरे आहेत. महादेवपूरजवळील आभाळवाडी, दरी-मातोरी, मुंगसरा, मनोली, चांदशी, गंधारवाडी, मखमलाबाद शिवारापासून पुढे मेरीपर्यंत बिबट्याचा संचार वाढला आहे. गंधारवाडी, मखमलाबाद, दुगाव-मुंगसरा परिसर, मनोली परिसर, जलालपूर शिवारात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पिंजरे बसविले आहेत.
नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:18 PM
नाशिक, दि.31- महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. तसंच या भागातील एका फार्महाऊसच्या ...
ठळक मुद्दे महादेवपूर परिसरात एका फार्महाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार कैद झाला आहे.. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतो आहे.