वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या शेकडो योजना असल्या तरी कित्येकदा या मुलांपर्यंत पोहोचण्यात यंत्रणा यशस्वी होतातच असे नाही. मात्र अशाच मुलांना शोधून त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार करण्यासाठी सेवाभावी आणि तळमळीचेच कार्यकर्ते लागतात. रामकुंडावर जडीबुटी आणि तत्सम साधने विकणाऱ्या मुलांचे आयुष्य असंच भटके राहू नये म्हणून तळमळीने विद्या माकुने या गेल्या पाच वर्षांपासून काम करीत आहेत. मूळच्या पिंप्री-चिंचवड येथील रहिवासी असलेल्या विद्या यांनी २०११ मध्ये या कामाची सुरुवात केली. रामकुंड आणि य. म. पटांगण परिसरात अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण सर्वप्रथम त्यांनी केले. त्यात ७२ मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळले. या मुलांना शिकण्यासाठी शाळेत जाण्याची सोय नाहीच शिवाय पालकांमध्ये इच्छेचा अभाव होता. त्यामुळे पालकांशी बोलून आणि त्यांना राजी करून मुलांना त्याच ठिकाणी खुली शाळा म्हणजेच संस्कार केंद्रात पाठविण्यासाठी राजी केले. त्यानुसार मुले येऊ लागली आणि मग य. म. पटांगणावरच मुक्तशाळा सुरू झाली. दुपारी दोन ते तीन या वेळेत येथे जमणाऱ्या मुला-मुलींची ही शाळा आजतागायत सुरू आहे. या मुलांना खाऊ, खेळ, गप्पा यांबरोबरच शालेय पाठ आणि अन्य संस्कारक्षम माहिती दिली जात असल्याने मुलेही रूची घेऊ लागली. या मुलांचे वयोगट वेगळे असले तरी त्यांना प्राथमिक ज्ञान दिल्यानंतर त्यांना शाळेत दाखल करून मूळ प्रवाहातही आणले जाते. गेल्या तीन वर्षांत सहा मुलांना विद्यातार्इंनी पेठे हायस्कूलमध्ये दाखल केले आहे. विद्यातार्इंच्या कुटुंबामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाप्रकल्पाची पार्श्वभूमी आहे. त्यांचे पतीही संघाच्या अन्नपूर्णा प्रकल्पांतर्गत काम करतात. त्यामुळे पतीप्रमाणेच कोणत्यातरी पद्धतीने सेवा करण्यासाठी त्यांची इच्छा होती आणि संस्कृत विषयात पदवी घेणाऱ्या विद्यातार्इंनी तशी सुरुवातही केली. अर्थात, विद्यातार्इंच्या सेवाव्रताला हेरून त्यांना साथ दिली ती संघाच्या राष्ट्रीय विकास मंडळाने. त्यामार्फतच मुलांना खाऊ दिला जातो आणि केंद्रही चालविले जाते. मात्र, या कार्यात पूर्णपणे झोकून देऊन विद्याताई देत असलेल्या योगदानाचे मूल्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
भटक्या मुलांसाठी मुक्त ज्ञान केंद्र
By admin | Published: October 19, 2015 11:21 PM