सायखेडा : निफाड, सिन्नर दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेले तळवाडे येथे तीन दिवसांपासून नागरिकांना दिवसादेखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी, मजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी शरद पोपट सांगळे यांना सायंकाळच्या वेळी बिबट्या त्यांच्या घराजवळ दिसला. उसाचे शेत जवळच असल्याने बिबट्याने उसात पलायन केले़ मात्र सकाळी शेतात पिकाला पाणी देत असताना राहुल किसन सांगळे यांना बिबट्याचे दर्शन झाले आणि त्यानंतर वारंवार बिबट्या दिसत असल्याने माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांनी येवला वनविभागास कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आहिरे, व लोंढे हे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता तळवाडे शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहिले. सातत्याने बिबट्या दिसत असल्यामुळे तत्काळ अधिकाऱ्यांनी पिंजरा लावला आहे. दिवसासुद्धा बिबट्या दिसत असल्याने शेतकरी, मजूर शेतात काम करीत असतात त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी आणि शेत कामगार कामासाठी बाहेर पडत नाही त्यामुळे कामे खोळंबली आहे, वनविभागाने एक पिंजरा लावला असला तरी परिसरात आणखी एखादा पिंजरा लावून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तळवाडे येथे बिबट्याचा मुक्त संचार
By admin | Published: December 30, 2016 11:11 PM