रब्बी हंगामातील गहू, हरबरा, मका व ऊस आदी पिके ऐन मोसमात असल्याने त्यांना पाणी देणे गरजेचे आहे. दर महिन्याला वीज वितरण कंपनीचे शेती पंपासाठी असणाऱ्या विजेचे वेळापत्रक बदलत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यात गेल्या दिवसांपासून येथे व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. नाशिक - पुणे महामार्ग, नांदूरशिंगोटे-निमोण रोड, मानोरी रोड व चास रोड या भागात अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाले आहेत. त्यामुळे बळीराजा शेतात काम करण्यासाठी धजावत नाही.
शनिवारी रात्री साडेवाजेच्या सुमारास निमोण रोडलगत असणाऱ्या नारायण शेळके, संजय आव्हाड, शरदचंद्र घुले यांच्या शेताकडे पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. अंधार असल्याने भ्रमणध्वनीवरून आसपासच्या शेतकऱ्यांना बिबट्या आले असल्याचे कळविले. काही शेतकऱ्यांनी बिबट्याला पळविण्यासाठी फटाके फोडले, तसेच गेल्या आठवड्यात चास रोडलगत एका युवकाला बिबट्याचे दर्शन झाले होते. वाड्या-वस्तीवर अनेकदा रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
इन्फो...
बिबट्याचा बंदोबस्त करावा
नाशिक : पुणे हायवेच्या उजव्या बाजूला, तसेच चास रोडलगत वनविभागाचे जंगल असल्याने, या परिसरात बिबट्याचा वावर असतो, परंतु गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्ती व गावालगत बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गात घबराट आहेत. दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना अडचणी येत आहेत. वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून सदर भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
- संजय आव्हाड, शेतकरी