नितीन बोरसे सटाणापंचायत समितीच्या निवडणुकीत बागलाणमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर पंचायत समितीची सत्ता राखण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बहुमत असलेल्या भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी दोन अपक्षांनी सहयोगी सदस्य म्हणून नोंदणी केल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अपक्षांच्या भाजपा पाठिंब्यामुळे माजी आमदार संजय चव्हाण यांचे सत्तास्थापनेचे मनसुभे उधळून लावले आहेत.बागलाण पंचायत समितीत तब्बल दहा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा प्रभाव रोखण्यासाठी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांनी माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या माध्यमातून भाजपाशी घरोबा करून सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले. माजी आमदार संजय चव्हाण यांनी पंचायत समितीमधील भाजपा व कॉँग्रेसच्या युतीला अभद्र युती संबोधून अशी सत्तेसाठी युती तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान नुकत्याच झालेल्या बागलाण पंचायत समितीच्या निवडणुकीत चौदा जागांपैकी भाजपाने सात जागा मिळवून काठावरच्या बहुमतापर्यंत झेप घेतली. पूर्ण बहुमत नसल्यामुळे संजय चव्हाण यांनी राष्ट्रवादी, कॉँग्रेस, अपक्ष असे प्रत्येकी दोन व सेना अशा सात सदस्यांना एकत्र आणून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची व्यूहरचना आखली होती. अपक्ष आणि कॉँग्रेसचे सदस्य गळाला लावण्यासाठी त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत असून, आज तरी त्यांना कॉँग्रेस आणि अपक्ष असे चार सदस्य एकत्र आणण्यात यश मिळाले नाही, तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी भाजपा शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. पठावे दिगर व मानूर गणातील दोन अपक्ष सदस्यांनी मृगजळाकडे न धावता त्यांनी सत्तेत जाण्यासाठी भाजपाच्या मंडळीशी संपर्क साधून भाजपाच्या गटात सहयोगी सदस्य म्हणून कायदेशीर नोंदणी केली आहे. यामुळे आता गुप्तबैठकांनाही वेग आला आहे. दरम्यान जायखेडा व आसखेडा गणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी काळात प्रलंबित सिंचन प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी निकालानंतर तत्काळ डॉ.भामरे यांच्याशी संपर्क साधून विकासासाठी आम्ही बिनशर्त भाजपाबरोबर राहणार असल्याची ग्वाही दिल्याचा दावा भाजपाने केला आहे. असे असले तरी माजी आमदार संजय चव्हाण यांनीदेखील पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी जुळवाजुळव सुरू केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.बागलाण पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी मानूर गणातील अपक्ष सदस्य पंडित अहिरे, अंतापूर गणाचे कॉँग्रेसचे सदस्य रामदास सूर्यवंशी, ताहाराबाद गणातील संजय जोपळे, तर भाजपाकडून वीरगाव गणातील विमल सोनवणे व कंधाणे गणातील मीना सोनवणे हे इच्छुक आहेत. सभापतिपद कायमस्वरूपी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने अन्य प्रवर्गातील सदस्यांना दुधावरची तहान ताकावर भागवावी लागणार आहे. त्यामुळे उपसभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यापदासाठी भाजपाचे ब्राह्मणगाव गणातील सदस्य व शेतकरी संघटनेचे नेते स्व. नरेंद्र अहिरे यांचे चिरंजीव अतुलकुमार, भाजपाचे विधानसभा अध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांच्या सौभाग्यवती कल्पना सावंत, ठेंगोडा गणातील ज्योती अहिरे यांची नावे चर्चेत आहेत.
सटाण्यात भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा
By admin | Published: March 06, 2017 12:39 AM