नाशिक : जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ७० अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले; परंतु एकाचेही भाग्य उजळले नाही.जिल्ह्यात यंदाही मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. नाशिक पूर्वमध्ये ७, नाशिक पश्चिममध्ये ११, नाशिक मध्य मतदारसंघात ४, देवळालीत ४, कळवणमध्ये १, बागलाणमध्ये ३, मालेगाव बाह्यमध्ये ६, मालेगाव मध्य मतदारसंघात ९, चांदवडमध्ये ४, येवलामध्ये ३, नांदगावमध्ये १०, निफाडमध्ये १, सिन्नरमध्ये ३, दिंडोरीत ३ तर इगतपुरीत ४ अपक्ष उमेदवार उभे होते. एकूण ७० अपक्षांमध्ये नाशिक पश्चिममध्ये अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे आणि नांदगावमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांच्या लढतीकडे लक्ष लागून होते. निफाडमध्येही माजी आमदार रावसाहेब कदम आणि मंदाकिनी कदम यांचे सुपुत्र यतिन कदम यांनीही अपक्ष उमेदवारी करत चुरस निर्माण केली होती. परंतु, चर्चेत असलेल्या या तीनही अपक्ष उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांची फारशी मात्रा चालली नाही. त्यातील बव्हंशी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मतदारांनी अपक्षांना थारा दिला नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात अपक्षांची धूळधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:41 AM