नाशिक - शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद होत असल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक यांची माहित घेतली जाईल. त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले होते. आता, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्याही मोफत देण्याची घोषणा शिक्षणमंत्री केसरकर यांनी केली आहे.
पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार असल्याची घोषणा केसरकर यांनी केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका संस्थांचे अध्यक्ष ब्रम्हांडशास्त्रज्ञ कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वी म्हटले होते. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, आता थेट वह्या मोफत देण्याची घोषणाच त्यांनी केली आहे.
शाळा बंद पडल्या तरी समायोजन होईल
विद्यार्थ्यांनी अमूक एका ठिकाणी शिक्षण घेतले तरच त्यांची गुणवत्ता वाढते असे नाही. त्यामुळे त्यांच्या शाळा बंद झाल्या तरी आसपासच्या शाळेत त्यांचे समायोजन होईल, त्यांना शाळा लांब पडत असेल तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल. कमी मुलांमध्ये शिकण्यापेक्षा मोठ्या गटात शिक्षण घेतले तर मुलांचा सर्वांगिण विकास होतो, त्यांच्या नेतृत्वगुणाला ते पोषक आहे, असे केसरकर यांनी यापूर्वी म्हटले होते.