नाशिक : जिल्ह्यात सोमवारपासून खासगी केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील ४० खासगी रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील ४७ शासकीय रुग्णालयांमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याने जिल्ह्यातील ज्येष्ठांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन सामान्यांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सुमारे सहा लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. ही लस शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाणार असल्याने ज्येष्ठांना कोरोनापासून संरक्षण कवच मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या मोहिमेत कुटुंबातील सर्व व्यक्तिंचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करतानाच, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्याशी संबंधित मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजारांची नोंद केली गेली होती. या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सुमारे सहा लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सरकारी केंद्रावर मोफत तर खासगी केंद्रांवर २५० रुपयात लस देऊन केले जाणार आहे.
इन्फो
लसीकरणाला मिळावा वेग
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान काही कुटुंबे मूळ गावी परत गेली असल्यास त्यांची नोंद इतर जिल्ह्यांमध्ये असू शकते. यातील ज्येष्ठ नागरिक पुन्हा शहरात परतले असल्यास अशा सर्व नागरिकांचे लसीकरण १ मार्चपासून सुरू होणार आहे. राज्यासह नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या संसर्गात पुन्हा लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे लसीकरण वेळेत झाल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकेल. त्यामुळे लसीकरण अधिक वेगाने व्हावे, अशी अपेक्षा केली जात आहे. त्यामुळेच सरकारी लसीकरण केंद्रांसह खासगी रुग्णालये, क्लिनिक येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात होती.
इन्फो
कोमॉर्बिड रुग्णांनादेखील मिळावे प्राधान्य
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतानाच ४५ वर्षांपुढील कोमॉर्बिड नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत जाहीर करण्यात आले आहे. ४५ ते ६० या वयोगटातील काही विशिष्ट आजार असलेल्या नागरिकांची संख्या खूप मोठी असल्याने मार्चपासून शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा आहे. अशा व्यक्तिंना लसीकरण सुरू केल्यास त्यांना संरक्षण मिळेल. आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांमध्ये याच गटातील सर्वाधिक रुग्ण होते. त्यामुळे हे मृत्यू टाळण्यासाठी लसीकरणाचा फायदा होईल तसेच मृत्यूदर कमी होऊ शकेल.
----------------------------------------------------
शताब्दी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, शाह हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, एचसीजी मानवता हॉस्पिटल, लोकमान्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, आयुष हॉस्पिटल, नामको चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, सिक्स सिग्गा मेडिकेअर, ॲपेक्स वेलनेस हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल, सूर्योदय हॉस्पिटल, सप्तशृंगी मॅटर्निटी, वक्रतुंड हॉस्पिटल, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सुशिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सुजाता बिर्ला हॉस्पिटल, संतकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महासिद्धी मल्टीस्पेशालिटी, श्री दत्तकृपा सुपर स्पेशालिटी, साई श्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, आस्था मल्टीस्पेशालिटी, सुयोग हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, निरामय मल्टीस्पेशालिटी, जनसेवा हॉस्पिटल, साई सेवा मल्टीस्पेशालिटी, लोटस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, देवळाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, एसएमबीटी इन्स्टिट्यूट, करुणा हॉस्पिटल, एम. नागराज नर्सिंग होम, धन्वंतरी हॉस्पिटल, हार्ट ॲन्ड सोल सुपरस्पेशालिटी, प्रयास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सिक्स सिग्मा मेडिकेअर ॲन्ड रिसर्च, समर्थ चिल्ड्रन्स हॉस्पिटल.