सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणार आहे. या कामामुळे बागलाणच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागणार आहे. देशात सर्वात उंच आणि अखंड पाषाणात कोरलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने २७५ कोटी रुपयांचे विशेष संपुट जाहीर केले होते. याच्या पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रु पयांचे कामे करून या तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रस्त्याच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकासाला ब्रेक लागला होता. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मूर्तीनिर्माण समितीला आवश्यक जमीन प्रदान केल्यामुळे येथील विकासाला मोठी चालना मिळणार आहे. २७५ कोटीच्या मंजूर निधीपैकी ५८ कोटी निधी खर्च झाला असून, उर्वरित निधीही खर्च करण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. येत्या वर्षभरात या निधीमधून साल्हेर, मुल्हेर, सालोटा हे किल्ले विकासाबरोबरच मूर्तीस्थळ विकास, हरणबारी धरणात बोटिंग, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा योजना व मांगीतुंगीला जोडणाºया सर्व रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे या जैन तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.पर्यटन विकासालाही चालना...शासनाने मांगीतुंगी व परिसर विकासासाठी २७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात मांगीतुंगीला जोडणारे चारही रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यात ताहाराबाद - मांगीतुंगी, साल्हेर - मुल्हेर, मुल्हेर - मांगीतुंगी, अंतापूर - मुल्हेर या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मांगीतुंगी गावासह तीर्थक्षेत्रासाठी थेट हरणबारी धरणामधून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार असून, याच धरणात पर्यटकांसाठी बोटिंग ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील साल्हेर गाव व परिसर दत्तक घेण्याचे जाहीर केले असून, सुमारे २८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्ते विकास, डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर सर्व मोबाइल कंपन्यांचे मनोरे उभारून सेवा पुरविण्यात येणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा, मॉडेल स्कूल आणि किल्ले विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
मांगीतुंगीच्या विकासाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:59 AM