सिन्नर : शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी, मापारी, हमाल व प्रशासन यांची संयुक्त बैठक झााली. यात सकारात्मक चर्चा होऊन कांदा गोणीमध्ये विक्रीसाठी आणल्यास लिलाव पूर्ववत होण्यास अनुकूलता दर्शविल्याने सोमवारपासून (दि. २५) सिन्नर मुख्य बाजारासह नायगाव येथील उपबाजारात लिलाव सुरू होणार आहे. शासनाने फळे व भाजीपाला नियमन मुक्त करताना शेतमालावरील अडत ही मालविक्रेता शेतकरी यांच्याकडून न घेता ती खरेदीदार विक्रेत्यांकडून वसूल करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी बाजार आवारातील शेतमाल खरेदीवर बहिष्कार टाकून बेमुदत बंद पुकारला आहे. सहकार व पणन खात्याच्या सूचनेनुसार बाजार समितीने बंदमध्ये सहभागी सर्व परवानाधारक व्यापारी व अडते यांना नोटिसा बजावून लिलावाचे दैनंदिन कामकाज नियमित सुरू करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, उपसभापती सोमनाथ भिसे, सचिव विजय विखे यांनी सिन्नर व नायगाव येथील परवानाधारक अडते, व्यापारी, हमाल व मापारी यांची संयुक्त बैठक घेतली. सिन्नर मुख्य आवारासह नायगाव येथील कांदा व धान्य भुसार शेतमालाचे लिलाव तत्काळ सुरू कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. त्यावर सर्व अडते, व्यापारी यांनी बाजार समितीची सूचना मान्य केली. बाजार समितीच्या वतीने सभापती वाघ यांनी आपला शेतमाल निवड व प्रतवारी करून ५० किलोच्या गोणीमध्ये भरून लिलावासाठी आणावा, जेणेकरून स्पर्धात्मक भाव मिळेल असे आवाहन केले. गेल्या आठवड्यात दोडी, नांदूरशिंगोटे व पांढुर्ली या उपबाजारात गोणी कांदा लिलाव सुरू असल्याने लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या धर्तीवर सिन्नर मुख्य बाजारासह नायगाव उपबाजारात कांदा गोणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस संचालक विनायक घुमरे, विनायक तांबे, सुनील चकोर, सुनील केकाण, सविता उगले यांच्यासह बाळकृष्ण चकोर, बाबूशेठ लढ्ढा, अनिल कलंत्री, नामदेव पन्हाळे, शिवनारायण कलंत्री, जयनारायण कलंत्री, सुरेश कलंत्री, कन्हैयालाल पारख, विजय तेलंग, बबलू ठक्कर, सोमनाथ बोडके, संजय सानप, सोमनाथ सानप, इम्तिहाज पटेल, पांडुरंग आव्हाड आदिंसह अडते, खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.(वार्ताहर)
कांदा, धान्य लिलाव सुरू होण्याचा मार्ग मोकळा
By admin | Published: July 21, 2016 11:44 PM