नाशिक : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या नाशिक महापालिकेला उदासीन भूमिकेचा फटका बसला आहे. एका उद्योजकाने शहरात मोफत वायफायसाठी मोफत बॅँडविथ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असताना केवळ प्रशासनाने हॉर्डवेअर खरेदीसाठी टाळाटाळ केल्याने हा विषय बाजूला पडला. त्यामुळे याच उद्योजकाने नवी मुंबईत मोफत अशाच प्रकारे सेवा देण्याचा प्रस्ताव तेथील महापालिकेने मान्य केला असून, येत्या काही दिवसांत हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायफायच्या माध्यमातून हायफाय होण्याचा प्रयत्न तूर्तास तरी बाजूला पडला आहे.नाशिकच्या ईएसडीएस या कंपनीने ही सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केला होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात बॅँडविथ असल्याने ती शहरासाठी मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी केली होती. तसा प्रस्ताव महापालिकेकडे दिल्यानंतर तत्कालीन सभागृह नेता शशी जाधव यांनीही पाठपुरावा केला होता. नाशिक महापालिकेने ही सेवा सुरुवातीला कॉलेजरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड तसेच सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत मोफत सेवा देण्यात येणार होती. तसेच या सेवेसाठी महापालिकेने हार्डवेअरचा खर्च करणे आवश्यक होते. पालिकेला त्यावेळी जेमतेम २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च करावा लागणार होता; परंतु तेवढी तसदीही नाशिक महापालिकेने घेतली नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये या वायफाय सेवेची घोषणा केली होती.
नवी मुंबईत मोफत वायफाय
By admin | Published: November 29, 2015 12:02 AM