नाशिक : स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे अजरामर काव्य लिहिल्याने ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरवले गेलेल्या कवी गोविंद यांच्याबाबतच्या बहुतांश स्मृती आता नाशिककरांना धुसर झाल्या आहेत. ‘मित्रमेळा’ ते ‘अभिनव भारत’ आणि त्यानंतर आजन्म सावरकर बंधूंच्या आणि परिवाराच्या सुखदु:खात साथ दिलेल्या या कवीचा स्मृतीदिनच नव्हे तर त्यांचे देशभक्तीपर कार्यदेखील विस्मृतीत गेले आहे.
नाशिकला सामान्य कुटुंबात जन्मलेले कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांच्यात बालपणापासूनच कमालीची काव्यप्रतिभा होती. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आल्याने त्यांचे लौकिक शिक्षणही झाले नव्हते. कविता मात्र बालपणापासून करीत होते. आरंभी ते लावण्या लिहीत. ‘हौशिने करा मसि गेंद गेंद । घडवा हो बाजुबंद ।’ ही लावणी म्हणजे त्यांची पहिली उपलब्ध कविता मानली जाते. मात्र, नाशिकमध्ये सावरकर बंधू रहायला आल्यानंतर कवी गोविंदांच्या प्रतिभेला जणू परीसस्पर्श झाला. १९०० या वर्षी नाशिकमधील ‘मित्रमेळा’ च्या निमित्ताने स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची जणू दिशाच गवसली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी, नरवीर तानाजी, समर्थ रामदास यासारख्या ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर लिहिलेल्या कविता तसेच ‘स्वातंत्र्याचा पाळणा’, ‘स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव’, ‘भारतप्रशस्ति’ ह्यांसारख्या कविता नाशिकमधील क्रांतिकारकांची प्रेरणगीते ठरली. या गीतांमुळे ते नाशिकसह राज्यभरात त्या काळी ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून प्रख्यात झाले होते. त्यामुळेच देशभक्तीने भारलेल्या त्यांच्या अनेक कविता ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या. त्याशिवाय 'कारागृहाचे भय काय त्याला? , 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या कितीतरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले होते. कवी गोविंद यांची कविता या नावाने त्यांच्या ५२ कविता संग्रहित झाल्या होत्या.
इन्फो
संकटकाळी धावले मदतीला
सावरकर बंधूंना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबांना ब्रिटिश सरकारने घराबाहेर काढले. ब्रिटिशांच्या धाकामुळे जेव्हा कुणीच त्यांना मदत करायला धजावत नव्हते. त्यावेळी गंगेवर रहावे लागलेल्या सावरकरांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालावा म्हणून ते काळाराम मंदिरात रामायण, महाभारत कथा सांगून त्यातून मिळणारे धान्य आणून मातांकडे सुपूर्द करीत होते.
फोटो
२७कवी गोविंद