नाशिक : प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने व व्यावसायिक आस्थापनांसाठी आता वेळेचे निर्बंध पूर्णपणे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे आता दररोज दुकाने सकाळपासून त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, सम-विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानुसारच दुकाने सुरू असतील. या नियमात मात्र कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.महानगरातील बाजारपेठांमध्ये वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी जुन्या नाशिक भागाचा दौरादेखील केला होता. तसेच बाजारपेठेतील गर्दीचादेखील त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन दुकानांच्या वेळेबाबतचे निर्बंध पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनमध्ये शिथिलता देताना सर्व दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र दुकाने आणि आस्थापनांसाठी वेळेचे निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतरदेखील शहरी भागात होणारी गर्दी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याने याबाबत बैठकीत चर्चा झाली.शहरातील वाढत्या कोरोना संसर्गास पायबंद घालण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही प्रामुख्याने दुकानांच्या वेळेवर असलेल्या निर्बंधामुळे होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. दुकाने कमी काळ सुरू राहत असल्याने तसेच काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सम-विषम नियमामुळे एक दिवस बंद राहिल्याने नागरिक वस्तूंचा संचय करण्यासाठी गर्दी करतात, अशी बाब निदर्शनास आल्याने याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदीचा वापर करून दुकानांची वेळ वाढल्यास गर्दी विखुरली जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन सुकर होईल, असे प्रशासन प्रमुखांचे मत पडले. दरम्यान याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून दुकाने आणि आस्थापनांच्या वेळेचे निर्बंध अखेर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, या निर्णयामध्ये कंटेन्मेंट झोनला कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.कंटेन्मेंट झोन क्षेत्रात लागू असणारे निर्बंध येणाºया काळात अत्यंत कठोरतेने अंमलात आणले जातील. तसेच ज्या व्यावसायांना, दुकानांना सम-विषमच्या निकषानुसार बंदी असेल, किंवा बंदी असलेली दुकाने सुरू ठेवल्यास त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले.-----------------------सम-विषम नियमात ‘या’ दुकानांना मुभादुकाने, आस्थापनांच्या वेळेबाबतची बंधने मागे घेतली असली तरी सम-विषमचे नियम कायम राहणार आहेत. मात्र, सम-विषमचे नियम मेडिकल्स, किराणा दुकाने, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना लागू राहणार नाहीत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वेळेच्या निर्बंधातून दुकानांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:48 PM