नाशिक : हिंदू धर्माने जगाला विश्वात्मक अनुभूती दिली. केवळ या धर्मानेच मनुष्याला उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे औदार्य व महती मोठी आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर महाराज अभ्यंकर यांनी केले. वाघ शिक्षण संस्थेचे संस्थापक काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीनदिवसीय ‘संत ज्ञानेश्वर’ या विषयावर प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनमालेचा समारोप शनिवारी (दि.२८) करण्यात आला. यावेळी अभ्यंकर महाराज मार्गदर्शन करीत होते. यावेळी ते म्हणाले, हिंदू धर्माचे औदार्य मोठे आहे. यामुळे या धर्माचे पालन करणाऱ्यांनी कधी कोणाच्याही भूमीवर आक्रमण केल्याची नोंद इतिहासात नाही. मानवी जीवनाचे प्रेयस व श्रेयस असे दोन अंग आहेत. श्रेयस प्रारंभी जरी कटू वाटत असला तरी परिणामी तो अधिक मधुर आहे. असे अभ्यंकर यावेळी म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी अभ्यंकर यांचे स्वागत केले. प्रास्ताविक नंदन रहाणे यांनी केले. सूत्रसंचालन रसिका कुलकर्णी यांनी केले. इतिहासात जी परकीय आक्रमणे व युद्धांची नोंद आहे, अशी सर्व युद्धे ही सत्ता, संपत्ती, धन, भूमी अशा लालसेपोटी झाली असून, त्यांचा समावेश वृत्तीफलक युद्धांत होतो. त्यामुळे या युद्धांपासून कोणत्याही राष्टÑाचे व जगाचे हित साधले गेले नाही. धर्मफलक युद्ध हे मातृभूमीच्या गौरवासाठी, सज्जनांना न्याय मिळवून देण्यासाठी केले जाते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.
उपासनेचे स्वातंत्र्य केवळ हिंदू धर्मात : शंकर महाराज अभ्यंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:24 AM