मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री मालवाहतूक करणाऱ्या एन.एम.जी वॅगनची बोगी घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मेनलाईन वरील वाहतूक तब्बल दोन ते अडीच तास खोळंबल्याने सुमारे सात गाड्या विलंबाने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.
नांदगाव रेल्वे स्थानकानजीक रविवारी मध्यरात्री मालवाहतूक करणाऱ्या एन.एम.जी वॅगनची इंजिनापासूनची दुसरी बोगी लोहमार्गावरून घसरली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर घडलेल्या अपघातामुळे अप लाईनवरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेत अपघात ठिकाणी यंत्रणा पोहचली. रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले.
या अपघातामुळे पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या सात गाड्या विलंबाने धावत होत्या.यामध्ये गाडी क्रं ११०३४ दरभंगा - पुणे एक्स्प्रेस , गाडी क्रं.१२६१८ निजामुद्दीन - एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस , गाडी क्रं. १२११२ अमरावती - मुंबई एक्स्प्रेस , गाडी क्रं.१२८१० हावडा - मुंबई मेल , गाडी क्रं.१२१०६ गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेस , गाडी क्रं .१२१३८ फिरोजपूर - मुंबई पंजाब मेल , गाडी क्रं.१२१३६ नागपूर - पुणे एक्स्प्रेस या गाड्या दीड ते अडीच तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.