चांदवड : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिराजवळील घाटात डिझेल संपल्याने मालट्रक टेकडीला धडकून उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले.
मुंबई येथून धुळे येथे सोयाबीन घेऊन जात असलेला मालट्रक (एमएच १८ एए ७९५३) मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रेणुका देवी मंदिराजवळील घाटातून जात असताना डिझेल संपल्याने ट्रकने एअर पकडला. त्यामुळे ट्रक उतारावरून पाठीमागे येऊन महामार्गालगतच्या टेकडीला धडकून महामार्गावर उलटला. या अपघातात ट्रकमधील चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मंगरूळ टोलनाक्यावरील सोमा कंपनीचे कर्मचारी शशिकांत पवार, संदीप तायडे, ज्ञानेश्वर ढोमसे, कैलास आहेर, भाऊराव कुंभार्डे, राजू कुंभार्डे, शरद ठाकरे, भूषण शेळके, प्रतीक अहिरे, ज्ञानेश्वर पवार आदींनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रकमधील सोयाबीन दुसऱ्या ट्रकमध्ये भरून ट्रक रवाना करण्यात आला.