पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील गंगापूर, कडवा कालवा, पालखेड व ओझरखेड या प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पार पाडली.
बैठकीत विविध प्रकल्पांतर्गत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बी हंगामासाठी कडवा कालव्यास ३१ दिवसांचे १ आवर्तन सोडण्यात आलेले आहे, तर बिगर सिंचनासाठी ३ दिवसांचे किंवा पाणी उपलब्धतेनुसार १ आवर्तन देण्यात येणार आहे. तसेच गंगापूर धरणाच्या नाशिक डावा तट कालव्यास रब्बी हंगामासाठी ३ आवर्तने, उन्हाळ हंगामासाठी ३ आवर्तने देण्यात येणार आहेत. पालखेड धरणाच्या पालखेड उजवा तट कालव्यास रब्बी हंगामासाठी ३ आवर्तने, तर उन्हाळ हंगामासाठी ३ आवर्तने देण्यात येणार आहे.पालखेड डावा तट कालव्यास रब्बी हंगामासाठी २ आवर्तने तर उन्हाळ हंगामासाठी (बिगरसिंचन) २ आवर्तने देण्यात येणार आहेत. ओझरखेड कालव्यास रब्बी हंगामासाठी २ आवर्तने देण्यात येणार असून, उन्हाळ हंगामासाठी (बिगरसिंचन) १ आवर्तन देण्यात येणार आहे.उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून व पाणी बचत करून ओझरखेड समूहातून १ वाढीव आणि कडवा कालव्यासदेखील १ वाढीव आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.