पाश्चिमात्य देशातील संस्कृतीचा प्रभाव आपल्याकडे विविध माध्यमातून बघायला मिळतो. त्यातील एक फ्रेंडशिप डे. मित्राची महती, मित्रावरील प्रेम व्यक्त, मित्राचं गुणगान गाणारा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. मित्राच्या मैत्रीची व्याख्या करणं तसं फार अवघड आहे. कारण कोणता व्यक्ती कुणाला कशाप्रकारचा मित्र म्हणून भावेल हे सांगू शकत नाही. प्रेम, जिव्हाळा, स्वभाव, सवयी या प्रामुख्याने मैत्रीची अंगे आहेत. दोन मनं मिळाली, जुळली स्वभाव, सवयी जुळल्या की मैत्री झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला मित्र अगदी जवळचा, सुखदुःखात साथ देऊन भावना जपणारा, जाणणारा हवा असतो. सखा सोबती फक्त तिऱ्हाईत व्यक्तीच असू शकत नाही. तर आई- बाबा, पती-पत्नी, सासू-सुना, नणंद-भावजयी, जावा-जावा कोणीही असो एकदा जर नात्याची गुंफण घट्ट मैत्रीत झाली की, त्याच्या गुणदोषासह स्वीकारून मैत्री फुलत जाते. मैत्रीला कसलंही बंधन नसतं. ना जातीचं, ना धर्माचं. ना वयाचे, ना लिंगाचे. निस्वार्थी मैत्री करणाऱ्या मैत्रीचं नात अतूट असते.
इन्फो
सोशल मीडियावर मैत्रीची उधळण
मैत्रीवर भावनाशील भाष्य करणारी अनंत राऊत रचित यांची कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भावनांना स्पर्शून जाणारा गाभा प्रत्येकाच्या अंतर्मनाचा ठाव ठेवून जातो. ऋषिकेश रिकामे याने आपल्या स्वरातून उमटवलेली मैत्रीची महती प्रत्येकाच्या ओठांत उमटते आहे. अनंत राऊत यांची सोशल मीडियावर व्हायरल होणारे काव्य "दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा" ही कविता आजही तरुण-तरुणींच्या मनात घर करून बसली असून ज्या मित्रांचे मित्र आज त्यांना सोडून गेले आहेत अशांना ती कविता एक औषध बनलं आहे. म्हणून प्रत्येकाच्या ओठांत एक वाक्य आज गुणगुणताना निघत आहे "मित्र, वणव्यामध्ये... गारव्यासारखा..!"