नाशिक : फेसबूकवरून संपकर् ात येत मैत्रीचा फार्स करत एका अज्ञात चोरट्याने शहरातील एका ४३ वर्षीय शिक्षक महिलेला सुमारे ५२ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विदेशातून भेटीसाठी भेटवस्तू घेऊन येत असून ती भेटवस्तू ‘कस्टम’कडून विमानतळावर जप्त झाली, असा बनाव करत त्या परदेशी मित्राने शिक्षिकेची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.फेसबुकवरु न ओळख करून घेत त्या विदेशी अज्ञात मित्राने शिक्षिकेशी चॅटिंगद्वारे संवाद वाढविला. नोव्हेंबर २०१८ पासून संशयित इसम शिक्षीकेसोबत फेसबुकवरु न संवादामार्फत सातत्य टिकवून होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघांचा संवाद वाढत गेला. एकेदिवशी त्या अज्ञात फेसबूक मित्राने खात्री पटल्यानंतर आपले जाळे फेकले. ‘मी तुला परदेशातून भेटण्यासाठी येत आहे,’ असे सांगून विश्वास जींकला. त्यानंतर त्याने महिलेशी संवाद साधत ‘तुझ्यासाठी एक भेटवस्तू मी पाठविली आहे, विमानतळावर ती कस्टम विभागाने जप्त केली आहे’, असे सांगून ती भेटवस्तू सोडविण्यासाठी काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यामुळे महिलेने आॅनलाइनपध्दतीने काही रक्कम भरली. यानंतर त्या भामट्याने वेळोवेळी विविध कारणे देत त्या शिक्षक महिलेकडून सुमारे दीड वर्षात ५१ लाख ९५ हजार ४८९ रूपये आॅनलाइन उकळले. त्यानंतर तो मित्र प्रत्यक्षातदेखील भेटण्यास आला नाही, किंवा त्याची भेटवस्तूही महिलेला मिळाली नाही, त्यामुळे आपली पुर्णपणे फसवणूक केली गेल्याची खात्री पटली आणि महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन करत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे पुढील तपास करीत आहेत.
फेसबुकवर मैत्री पडली महाग; विदेशी अज्ञात मित्राने उकळले ५२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 2:14 PM
नोव्हेंबर २०१८ पासून संशयित इसम शिक्षीकेसोबत फेसबुकवरु न संवादामार्फत सातत्य टिकवून होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघांचा संवाद वाढत गेला.
ठळक मुद्देदीड वर्षात ५१ लाख ९५ हजार ४८९ रूपये उकळले.