देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या हद्दीत विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघर्ष समिती आरके ग्रुप, ईगल ग्रुप, आकाश मित्रमंडळाच्या वतीने छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.हाडोळा परिसरातून मंगळवारी सकाळी मेन स्ट्रीट, हौसन रोड मार्गे घोषणा देत छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ काळे, राहुल काळे, भैयासाहेब कटारे, सुभाष बोराडे, किलेश बोराडे, सायरा शेख, रवी गायकवाड, सचिन भालेराव, संगीता गांगुर्डे, शालिनी गायकवाड आदिंसह नागरिक सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यामुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधीनगर झोपडपट्टी, जुनी व नव्या स्टेशनवाडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, आंबेडकर सोसायटी येथील शौचालयाची दुरवस्था, ग्रीन जिम, मोकाट कुत्रे व इतर जनावरांचा वाढलेला उपद्रव, स्मशानभूमी रस्ता, भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम, सर्वांना घरपट्टी लागू करावी, अंत्यविधीसाठी साहित्य मोफत मिळावे, मुबलक पिण्याचे पाणी मिळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी अजय कुमार यांनी शिष्टमंडळाला यातील बऱ्याच मागण्या छावणी परिषदेने मंजूर केल्या आहे त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले.
देवळाली छावणी परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:05 AM