नाशिक : शहरातील डबघाईस आलेल्या पतसंस्था, नागरी बॅँकांंच्या गैरकारभारात गुंतवणूकदार व ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गेल्या १० ते २० वर्षापासून अडकून पडले असून, या ठेवी परत मिळण्यासाठी सहकार खात्याकडून कोणतेही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ राज्य ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मारक येथूून ठेवीदारांनी मोर्चा काढला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदनही सादर केले. त्यात म्हटले आहे की, कपालेश्वर क्रेडीट कॅपीटल, झुलेलाल, चांदवड पतसंस्था, सिन्नर नागरी बॅँक, बीएचआर, श्रीराम बॅँक, गणेश बॅँक, गिरणा बॅँक आदी पतसंस्था व सहकारी बॅँकेच्या संचालकांनी गैरकारभार केल्यामुळे त्या डबघाईस आल्या आहेत. या संस्थांची सहकार खात्यामार्फत चौकशीही पूर्ण झालेली असून, दोषीही ठरविण्यात आले आहे. काही प्रकरणात मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. असे असतानाही ठेवीदारांना मात्र त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. बहुतांशी ठेवीदार आजारपणामुळे देवाघरी गेले तर काहींचे मुला-मुलींचे लग्न रखडले आहेत. मात्र सहकार खाते त्याबाबत काहीच पावले उचलत नाहीत. बीएचआर पतसंस्थेत एक हजार कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या असून, अवसायक नेमूनही पतसंस्थेचे कर्ज वसूल होत नाही. त्यामुळे अवसायक बदलण्यात यावा तसेच एमपीआयडी कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी कोणता सक्षम अधिकारी नेमला याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात दामोधर दाभाडे, अशोक मांडोरे, सुहास पाणदारे आदी सहभागी झाले होते.