नाशिक : केंद्र सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्यातील कामगार विरोधी तरतुदी मागे घ्याव्यात यासह कामगारांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सीटूने शनिवारी कामगारांची साप्ताहिक सुटी पाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व डॉ. डी. एल. कराड यांनी केले. जुना त्र्यंबकनाका, जिल्हा परिषद मार्गे शालिमार चौक, टिळकपथ, सांगली बॅँक कॉर्नर, महात्मा गांधी रोड, मेहेर येथून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा मोर्चा अडविण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात केंदातील भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात भूमिका घेत असून, नवीन कामगार कायद्यात अशाच प्रकारे कामगार विरोधी तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. भांडवलदारांना मोकळीक देऊन कामगारांवर उपासमारीची वेळ आणली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात कॉ. आर. एस. पांडे, एस. के. ठोंबरे, श्रीधर देशपांडे, कल्पना शिंदे, भिवाजी भावले, देवीदास अडोळे, संतोष काकडे, भूषण सातळे, खंडेराव झाडे, सिंधू शार्दुल, अनिल भागवत यांच्यासह हजारो कामगार सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: May 31, 2015 1:16 AM