नाशिक : नाशिक पूर्व विभागात जुने नाशिक गावठाणासह मुस्लीम बहुल भाग असल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिलेला आहे. मागील निवडणुकीत मनसेने आश्चर्यकारक मुसंडी मारत तब्बल नऊ जागा खिशात टाकल्या होत्या. यंदा मात्र, विभागात मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी व पक्षांतरामुळे मातब्बर उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. निवडणुकीत सेना-भाजपाने आव्हान उभे केल्याने मनसेसह कॉँग्रेस आघाडीची वाट खडतर मानली जात आहे. प्रामुख्याने, प्रभाग क्रमांक १३ मधील लढत लक्षवेधी व रंगतदार ठरणार आहे. नाशिक पूर्व विभागात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी ५, कॉँग्रेस ४, मनसे ९, भाजपा २, शिवसेना १ आणि अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल होते. मात्र, यंदा निवडणुकीच्या तोंडावर २४ पैकी तब्बल १३ नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षांशी घरोबा केला. त्यातील ८ नगरसेवक पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. पूर्व विभागात प्रभाग क्रमांक १३ मध्ये मातब्बर आमने-सामने उभे ठाकले आहेत. भाजपाकडून नगरसेवक माधुरी जाधव व कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यापुढे सेनेच्या स्नेहल संजय चव्हाण यांचे आव्हान आहे. माजी नगरसेवक गजानन शेलार व माजी महापौर यतिन वाघ एकमेकांसमोर उभे ठाकल्याने याठिकाणी चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे. सभागृहनेत्या मनसेच्या सुरेखा भोसले, गजानन शेलार, कॉँग्रेसचे शाहू खैरे व वत्सला खैरे यांनी एकत्रित पॅनल करत प्रचार केल्याने हा पॅटर्न लक्षवेधी ठरला आहे. या प्रभागात कॉँग्रेस आघाडीने सेना-भाजपापुढे आव्हान उभे केले आहे. प्रभाग १४ मध्ये राष्ट्रवादीच्या शोभा संजय साबळे व सेनेच्या सायली शरद काळे यांच्यात प्रमुख सामना होईल, तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या समिना मेमन यांच्यासाठीही अस्तित्वाची लढत आहे. मुस्लीम बहुल भाग असल्याने कॉँग्रेस आघाडीसमोर सेना-भाजपा कितपत प्रभावी ठरते, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. प्रभाग १५ मध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते विरुद्ध सेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांच्यात काट्याची लढत रंगेल. याशिवाय, मनसेचे संदीप लेनकर व कॉँग्रेसचे गुलजार कोकणी यांच्याही उमेदवारीमुळे मतविभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. प्रभाग १६ मध्ये कॉँग्रेसचे राहुल दिवे विरुद्ध भाजपाचे कुणाल वाघ यांच्यातील लढत रंगतदार ठरणार आहे. विद्यमान नगरसेवक मेधा साळवे, नंदिनी जाधव यांच्यासाठीही अस्तित्वाची लढत आहे. प्रभाग २३ मध्ये रूपाली निकुळे, नीलिमा आमले, सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे यांची कसोटी लागणार आहे. याठिकाणी प्रामुख्याने, सेना-भाजपा-राष्ट्रवादी अशी लढत पहायला मिळणार आहे. प्रभाग ३० मध्ये भाजपाकडून उमेदवारी करणाऱ्या डॉ. दीपाली कुलकर्णी विरुद्ध शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार रशिदा शेख यांच्यात सामना रंगणार आहे. शिक्षण सभापती संजय चव्हाण विरुद्ध विद्ममान नगरसेवक सतीश सोनवणे यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळेल. नाशिक पूर्व विभागात यंदा २१ विद्यमान तर ८ माजी नगरसेवक आपले नशीब आजमावत आहेत. बंडखोरीमुळे मोठ्या प्रमाणावर मतविभागणीही होण्याची शक्यता आहे. या विभागात काही धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनसेसह आघाडीची वाट खडतर
By admin | Published: February 19, 2017 12:12 AM