सटाणा : महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या बागलाण शाखेतर्फे सोमवार (दि.२४)पासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कोतवाल संघटनेच्या सदस्यांनी शासनविरोधात घोषणाबाजी केली.याबाबत संघटनेतर्फे तहसीलदार प्रमोद हिले यांना दिलेल्या निवेदनात, राज्यातील कोतवालांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासन कोणतीही दखल घेत नसल्याने नाईलाजास्तव संघटनेला कामबंद आंदोलन छेडावे लागले आहे. शासनाने राज्यातील कोतवालांना विनाविलंब चतुर्थश्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी आजपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येत्या ३१डिसेंबरपासून मुंबई येथे आझाद मैदानावर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन छेडणार आहोत. राज्य शासनाने मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनात अंबादास जगताप, किशोर जगताप, राजू सोनवणे, बाळकृष्ण सोनवणे, संदीप पानपाटील, रवींद्र बच्छाव आदींसह तालुक्यातील कोतवाल सहभागी झाले आहेत.
सटाणा तहसीलसमोर कोतवालांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 1:25 AM