नाशिक : सेवानिवृत्ती अगोदर दिली जाणारी उपदान अग्रिम बंद करणे, वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणेपेन्शन योजना लागू न करणे यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने मंगळवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शालिमार, सारडा कन्या विद्यालय, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल व शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा समाप्त झाला. यावेळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी घोषणा देत निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. महावितरण कंपनीच्या पाच कंपन्या करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच महावितरण कंपनीमध्ये प्रचंड वाढलेली कंत्राटी पद्धत, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना घटनात्मक अधिकारांच्या विरोधात कंपनीने निर्गमित केलेले परिपत्रक ५२२ व २५६ वीज कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अगोदर दिली जाणारी उपदान अग्रिम बंद करणे, वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे पेन्शन योजना लागू न करणे, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार कंपनीत सामावून न घेणे, एकतर्फी बदलीचे धोरण तयार करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बदली प्रकरणे प्रलंबित ठेवणे, या सर्व कारणांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात संघटनेचे पदाधिकारी व सभासद सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)विद्युत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा मोर्चा.
विद्युत कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By admin | Published: December 29, 2015 11:09 PM