सटाणा : शहरालगत असलेल्या मळगाव येथील देशी दारूचे दुकान जाळपोळ प्रकरणी पोलिसांचे धरपकड सत्र सुरू असून, सोमवारी मळगावच्या पोलीसपाटलासह दोघांना पोलिसांनी अटक केल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे. गावातील दोनशे ते अडीचशे महिला व गावकऱ्यांनी अटकेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.मळगाव येथील दारू दुकान मालकासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याबरोबरच दुकान जाळून टाकल्याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ४० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर सोमवारी सकाळी दंगलखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पकडसत्र सुरू केले. या मोहिमेत मळगावचा पोलीसपाटील रोशन सावकार, केदा ठोके यांना अटक करण्यात आली.त्यांच्या अटकेमुळे प्रकरण अधिकच चिघळले असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सभा घेऊन निषेध नोंदवला. त्यानंतर संतप्त महिला व ग्रामस्थांनी दारू बंदी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम, सरोज चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली मळगाव ते सटाणा मोर्चा काढून तहसीलवर हल्लाबोल केला. यावेळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत, निष्पाप माणसांना सोडा अन्यथा आम्हाला अटक करा, अशी आक्रमक भूमिका मोर्चेकरी महिलांनी घेतली. यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर, उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक किशोर गायकवाड यांनी हस्तक्षेप करून महिलांना शांत केले. यावेळी दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करून दुकान हटविण्यासाठी लवकरच प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. (वार्ताहर)
सटाण्यात महिलांचा तहसीलवर मोर्चा
By admin | Published: April 25, 2017 1:55 AM