कोरोना चाचणीसाठी वाढली गर्दी
नाशिक: शहारात अनेक ठिकाणी ॲन्टीजेन टेस्ट चाचणीची केंद्रे सुरू असून या सर्व ठिकाणी तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डॉक्टरांकडून देखील चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
सिग्नल यंत्रणा अखेर सुरळीत
नाशिक: नाशिक पुणे महामार्गावरील आयनॉक्स सिनेमा चौकातील सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरू झाली आहे. मागील महिन्यात सिग्नल सातत्याने बंद असल्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ निर्माण होत होता. वाहतूक पोलीसही पूर्णवेळ थांबत नसल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. आता यंत्रणा सुरळीत सुरू आहे.
टाकळी मार्गावर लोखंडी दुभाजक
नाशिक: टाकळी मार्गावर लोखंडी दुभाजक टाकण्यात येत असल्याने रस्त्याचे रूप पालटले आहे. टाकळी मार्गावरील असलेल्या दुभाजकाची उंची वाढविण्यात येऊन त्यावर आता लोखंडी दुभाजक लावण्यात आले असून रंगरंगोटीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू झाले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीच्या आत काम पूर्ण केले जाणार आहे.
जुने नाशिकमध्ये गर्दी कायम
नाशिक: जुने नाशिकमधील अंतर्गत रस्त्यांवरील गर्दी कायम असून या भागात निर्बंध नियमांचे फारसे पालन होताना दिसत नाही. अनेक छोटीमोठी दुकाने सुरूच ठेवण्यात आली आहेत. बहुतांश दुकाने ही घरातच असल्याने ती लक्षातही येत नाहीत. अन्य व्यवसाय देखील सुरळीत सुरू असल्याने जुने नाशिकमधील रस्त्यांवरील गर्दी कायम असल्याचे दिसते.
भाजीपाला घेण्यासाठीही वाढली गर्दी
नाशिक: शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्याची चर्चा असल्याने बाजारात शुक्रवारी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी वाढल्याचे दिसून आले. अर्थात जीवनावश्यक म्हणून भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नसल्याने बाजारात गर्दी वाढल्याचे दिसून आले.