नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असून स्वयंपाकाचा गॅसही महागल्याने इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. १ नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत १ फेब्रुवारीपर्यंत पेट्रोल ५.६ रुपयांनी, तर डिझेल ६.२९ पैशांनी वाढले असून गत दहा दिवसात सलग दरवाढ झाल्यामुळे पेट्रोल ९६.६८ रुपये तर डिझेल ८६.३४ रुपयांपर्यंत पोहोचले असून हायस्पीड पेट्रोलने थेट शंभरीचा उंबरठा गाठत ९९.५० रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा गॅसही गत चारमहिन्यात तब्बल सव्वाशे ते दिडशे रुपयांनी महागला असून सध्या सिलिंडरमागे ७७३ रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.
केंद्र सरकारने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या कमी होणाऱ्या किमतीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगत पेट्रोल व डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त केल्या. परंतु, त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होण्याऐवजी भूर्दंडच अधिक बसला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकला नाही. मात्र, दरवाढ मात्र तत्काळ लागू होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कमच जमा झालेली नाही. अशा स्थितीत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरही तब्बल १२५ ते १५० रुपयांनी महागला आहे. विशेष म्हणजे सरकारकडून अनुदानित सिलिंडरच्या किमतीतही जवळपास शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळणारे अनुदान बंद झाले आहे. नाशिक जिल्ह्यात भारत गॅस, इंडियन ऑईल तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे मिळून १३ लाख गॅस ग्राहक आहेत. यातील अनुदानित सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात महिन्याला साधारण दहा लाख रुपयांचे अनुदान जमा होते. गॅस सिलिंडरच्या कमी-जास्त होणाऱ्या किमतीनुसार ही रक्कम ठरते. मात्र, एप्रिल २०२०पासून गॅस अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.
--
अशी आहे इंधन दरवाढ
महिना - पेट्रोल - डिझेल - गॅस
१ नोव्हेंबर- ८८.२१- ७६.१६ - ५९८
१ डिसेंबर - ८९.४४ - ७८.२० - ६४८
१ जानेवारी - ९०.७६ - ७९.७१ - ६९८
१ फेब्रुवारी - ९३.२८ - ८२.४५ - ७२३
१७ फेब्रुवारी - ३६.६८ -८६.३४- ७७३
--
एृ
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचे फायदे थेट ग्राहकांना मिळतील, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. पेट्रोल डिझेलच्या किमती कधीतरी काही पैशांमध्ये होतात. उलट दरवाढ रुपयांमध्ये होत असून प्रत्येक आठवड्याला अथवा महिन्याला दरवाढ होत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक सतत वाढणाऱ्या महागाईत होरपळून निघत आहे.
- रोहित जाधव, पेट्रोल ग्राहक
--
डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट अन्य वस्तूंवरही होत असून त्यामुळे महागाई वाढत आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असून ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात आवश्यक आहे. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
- संकेत डोंगरे, मालवाहू वाहनचालक
---
स्वयंपाकाचा गॅसही गेल्या तीन-चार महिन्यात दीडशे ते दोनशे रुपयांनी महागला आहे. सरकारकडून स्वच्छ इंधनाचा आग्रह धरला जात असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सबसिडीही मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस मिळालेल्या कुटुंबीयांना सिलिंडर रिफील करणेही शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण पुन्हा चुलीकडे वळू लागले आहेत. - अंजली पवार, गृहिणी
इन्फो-
गॅसचा सिलिंडर १७५ रुपयांनी
स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर तब्बल १७५ रुपयांनी महागला आहे. नोव्हेंबर महिन्यात ५९८ रुपयांना मिळणार सिलिंडर आहात. तब्बल ७७३ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून शहरातही गरीब वस्त्यांमध्ये सकाळच्या सुमारास चुलींचा धूर दिसू लागला आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच स्वयंपाकाचा सिलिंडर आणि किराणा मालाच्या किमतीही वाढल्या असून सतत वाढत असलेली महागाई आणखी किती रडवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.