मनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये वाहतूकदारांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशी कंपनी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मागे घेण्यात आला. दरम्यान, यामुळे बीपीसीएल कंपनीतून होणारा इंधनपुरवठा पूर्ववत सुरळीत होणार आहे. वाहतूक दर कमी मिळत असल्याने तो वाढवून मिळावा या मागणीसाठी येथील वाहतूकदारांनी संप पुकारला होता. नव्या निविदेप्रमाणे देण्यात येणारे दर हे वाहतूकदारांना परवडत नसल्याने ते वाढवून द्यावे ही वाहतूकदारांची मागणी होती. कंपनी प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले होते. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाची दखल घेऊन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, प्रकल्प अधिकारी व वाहतूकदार यांच्या संयुक्त झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या नंतर माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, संजय पवार यांनी पानेवाडी येथे प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी वहातुकदार संघटनेचे नाना पाटील, संजय पांडे, सचिन गवळी, अशोक सानप आदी सदस्य उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर संप मागे घेण्यात आल्याचे वहातुकदार संघटनेकडून सांगण्यात आले.
इंधन वाहतूकदारांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:37 AM