पंचवटी : हात उसनवार घेतलेली रक्कम परत मिळावी, यासाठी तगादा लावल्याने हनुमानवाडी मोरेमळा परिसरात राहणाऱ्या पूजा विनोद आखाडे (२३) विवाहितेचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर खून प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी मोरे मळ्यातील फरार संशयित रिक्षाचालक सागर दिलीप भास्कर उर्फ आदेश (२४) याला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे.
म्हसरूळ भागात गेल्या मंगळवारी रात्री महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून ओळख पटविण्यासाठी शहरातील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये महिला बेपत्ता असल्याच्या घटनेची माहिती घेतली. त्याच दिवशी रात्री मोरे मळ्यातील विनोद आखाडेने पत्नी पूजा बेपत्ता असल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याचाकडून महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून घेतल्याने मयत महिला ही त्याची पत्नीच असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत महिलेचा खून झाला असून तो भास्कर नामक व्यक्तीने केल्याची माहिती समोर आली. संशयित रिक्षाचालक असल्याने पोलिसांनी त्याचा शोध केला. या कारवाईत पोलिसांनी त्याची रिक्षाही ताब्यात घेतली असून, रिक्षाचालक भास्करलाही गुजरातमधील बार्डोली येथून ताब्यात घेत नाशिकला आणले आहे. दरम्यान,
भास्कर व मयत पूजा यांच्यात जवळीक असल्याने त्याने पूजाकडून २५ ते ३० हजार रुपये घेतले होते. या रक्कमेसाठी पूजाने तगादा लावल्याने त्याचा राग मनात धरून पैसे देतो असे सांगून भास्करने पूजाला म्हसरूळ भागातील पवार मळ्याकडे नाल्याजवळ नेत तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून असल्याची कबुली संशयिताने पोलिसांनी दिल्याचे समजते.