नाशिक : शहरात भूमाफियांच्या टोळीचा म्होरक्या व आनंदवली येथील वृध्द भूधारकाच्या खुनाचा नियोजनबध्द कट रचून सुपारी देणारा संशयित आरोपी फरार रम्मी राजपूत यास नाशिक पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारी (दि.५) ताब्यात घेतले असून पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी त्यास दुजेारा दिला आहे. त्याला नाशिकमध्ये आणण्यात येत आहे. राजपूत याच्याविरुध्द मोक्काअन्वये पोलीस आयुक्तांनी कारवाई केली होती. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यास फरार घोषित केले होते.तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
आनंदवली येथे फेब्रुवारी महिन्यात रमेश वाळू मंडलिक (७०) या वृध्द भूधारकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा भूमाफियांच्या टोळीविरुध्द दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पाण्डेय यांनी वैयक्तिक लक्ष घालत वेळोवेळी तपासी पथकांना मार्गदर्शन करत सूचना केल्या. यामुळे या खुनामागे भूमाफियांचा हात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण १२ संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पाण्डेय यांनी या गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असणारे तसेच टोळीला मदत करणाऱ्या सर्व संशयितांविरुध्द मकोका कायद्यानुसार कारवाई करत प्रस्ताव पोलीस महासंचालकांसह उच्च न्यायालयाला पाठविला होता. न्यायालयास अपर महासंचालकांनीदेखील या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. या गुन्ह्यात राजपूत हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तेव्हापासून पोलिसांकडून विविध पथके ठिकठिकाणी रवाना करत राजपूतचा माग काढला जात होता. तांत्रिकविश्लेषण शाखेचीही मदत यासाठी पोलिसांच्या पथकांकडून घेतली जात होती. ‘नेटवर्क’मधील मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीवरून पोलिसांच्या पथकाने हिमाचल प्रदेश गाठून तेथे सापळा रचत शिताफीने राजपूत यास ताब्यात घेतले.