खामखेडा : येथील शिवाजी लक्ष्मण बोरसे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन मोठ्या जिद्दीने अॅपल बोराची लागवड करून प्रयोगशीलतेचा नवा आदर्शपाठ घालून दिला.शेती व्यवसायात वारंवार एकच पीक घेऊन सतत धोका पत्करण्यापेक्षा प्रयोग करून पाहणेही फायद्याचे ठरू शकते, असा विचार करून शिवाजी बोरसे यांनी आपल्या शेतात अॅपल बोराची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे सर्व खर्च वाया गेला होता. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत होता व आजही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करीत यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने बोरसे यांनी हा प्रयोग करून पाहिला.त्यांनी आपल्या शेतकरी मित्राच्या सल्ल्यानुसार थायलंड जातीच्या बोराच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामार्फत या अॅपल बोराच्या पिकाविषयी माहिती घेऊन बोराच्या रोपांची लागवड केली. त्यांनी शेतजमिनीचा पुरेपूर वापर व पाण्याचे योग्य नियोजन केले. सफरचंदांच्या आकाराइतके असलेल्या या बोराचे पीक पाहून परिसरातील इतर शेतकरी, ग्रामस्थही प्रभावित झाले. अनेक शेतकरी बोरसे यांच्या बागेला भेट देऊन चौकशी करत आहेत. सध्या गुजरात, अहमदाबाद, मालेगाव, नाशिक आदि ठिकाणी अॅपल बोर विक्रीस जात आहेत. शिवाजी बोरसे हे वसाका कारखान्यात मुख्य लेखापाल म्हणून नोकरीस होते; परंतु लहानपणी वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत असताना त्यांना शेतीची आवड निर्माण झाली व त्यांनी आजपर्यंत शेतात अनेक प्रकारच्या फळबागांची लागवड करून वेगवेगळे प्रयोग केले आहेत. (वार्ताहर)
अॅपल बोराचे पीक घेत फुलविली बाग
By admin | Published: December 23, 2014 10:20 PM