ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत बागलाण तालुक्यातील ७८ गावांसाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे २१ गावांना विविध विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पत्त्यासाठी सुमारे १ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १ कोटी ९ लाख रुपयांचा निधी संबंधीत विभागाला वितरित करण्यात आला आहे. या मंजूर कामांमध्ये आदिवासी वस्तींसाठी पाणीपुरवठा योजना तसेच भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये तालुक्यातील लाडुद, कंधाणे, जामोटी (वडे दिगर) गोळवाड (भीमनगर), तीळवण (वाडीचौल्हेर), वटार, भाक्षी, महड, बहिराणे, राजपूरपांडे, साळवण (कोदमाळ), माळीवाडे (गणेशनगर), मळगाव (तीळवण) येथील आदिवासी वस्तींसाठी पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण युनिट, दुहेरी हातपम्प मंजूर करण्यात आले आहेत. बाभुळणे येथे सौरदिवे घेण्यात आले. मळगाव खुर्द सामाजिक सभागृह बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.
इन्फो
भूमिगत गटारीही मंजूर
आदिवासी वस्तींमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन होऊन स्वच्छता राखण्याच्यादृष्टीने भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पिंपळकोठे, दऱ्हाणे, कौतिकपाडा, नळकस, कठगड, गोळवाड (फुलेनगर ) येथे भूमिगत गटार बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामामुळे स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागणार असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.