-----------------------------------------------
चिंचोली प्राथमिक शाळेत महिला दिन
सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोली व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक संपदा बैरागी व मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य धनश्री झाडे, तारा उगले यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
------------------------------------
मातीचे माठ बाजारात दाखल
सिन्नर : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारात दाखल झाले आहेत. ग्राहक थंड पाण्याचे माठ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणांहून माठ येथील बाजारात विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे कोरोना काळातील झालेले नुकसान यंदाच्या उन्हाळ्यात भरून निघेल, अशी आशा माठ बनविणाऱ्या कारागिरांना वाटू लागली आहे.
-------------------------------------
रसवंतिगृहे फुलू लागली
सिन्नर : तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी आता रसवंतिगृहे आता फुलू लागली आहेत. सिन्नर -शिर्डी, सिन्नर- संगमनेर आदी रस्त्याच्या कडेला रसवंतीची दुकाने थाटली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्राहकवर्गातून वेगवेगळ्या शीतपेयांना मोठी मागणी वाढली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात बऱ्याच शेतकरी वर्गाने देखील मुख्य रस्त्याच्या कडेला रसवंती गृह सुरु केले आहे.
-------------------------------
वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर उष्मा जाणवत असून, पहाटे थंडी पडत आहे. दिवसभर ऊन, रात्री व पहाटे थंडी असे विचित्र हवामान सध्या आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सर्दी, खोकला, ताप असे रूग्ण वाढत आहेत.
---------------------------------
खडांगळीला उन्हाळ कांद्याची चोरी
सिन्नर : तालुक्यातील खडांगळी येथील शिवारात शेतात काढलेला २५ क्विंटल उन्हाळ कांदा चोरट्यांनी चोरून नेला. सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या गुरुवारी ( दि. ४) मध्यरात्री ही घटना घडली. खडांगळी - पंचाळे शिवारात शेतकरी कारभारी आनंदा पगार यांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणीचे काम सुरू आहे. शेतमजुरांनी शेतात उन्हाळ कांदा काढून कांदा पातीत झाकून ठेवला होता.