नाशिक : खेडे विकासासाठी बंद केलेले लेखाशीर्ष पुन्हा सुरू करावे यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घातले. गुरुवारी (दि.२०) महासभेच्या पूर्वी राधाकृष्ण गमे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेतली आणि निधीचे समान वितरण करण्याची मागणी केली.नाशिक महापालिका स्थापन करताना २३ खेड्यांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेत याआधी खेडे विकास निधी नावाचे लेखाशीर्ष होते, मात्र ते आता नसून नगरसेवकांना कामे करताना अनेक अडचणी येतात.अधिकारी गेल्या पंधरा वर्षांपासून अशाप्रकारे निधीच खर्च केला नसल्याचे सांगत असतात. त्यापार्श्वभूमीवर अधिकारी खेडे विकास निधीतील कामे करण्यास आणि प्राकलने करण्यास टाळाटाळ करीत असून संबंधित अधिकाऱ्यांना २३ खेड्यांतील विकासकामे करण्यासाठी प्राकलन करण्याचे आदेश द्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देताना सुवर्णा मटाले, दिलीप दातीर, किरण गामणे, कल्पना पांडे, नयना गांगुर्डे, प्रशांत दिवे, भागवत आरोटे, सीमाताई निगळ, हर्षा बडगुजर, श्याम साबळे यांच्यासह अन्य सर्व नगरसेवक उपस्थित होते.निधी वाटपात सापत्नपणामहापालिकेच्या अंदाजपत्रकात सर्वांना समान निधी न देता काही नगरसेवकांच्या प्रभागात पाच ते सात कोटी रुपयांची कामे धरण्यात आली असून, काहींना मात्र जेमतेम निधी दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेने आयुक्तांकडे कैफियत मांडली आहे. शिवसेनेने थेट कोणावर आरोप केले नसले तरी सत्तारूढ भाजपानेच अंदाजपत्रकात मापात माप केल्याची तक्रार असल्याचे वृत्त आहे.
खेडे विकासकामांसाठी निधीचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:40 AM