नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल गावात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या टॅक्टर दुर्घटनेत सात मयत महिलांच्या दुर्देवी मृत्यू झाला. या महिलांच्या मृतदेहावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावात शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अजंग व वडेल या दोन्ही गावे शोकसागरात बुडाली असून गावक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी दोन्ही गावांना आज सकाळी भेट देत रास्ता रोको करणा:या रहिवाशांची समजूत काढून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेत महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली.दरम्यान, महाजन व भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व जखमींचा खर्च शासन उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला व महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास तयारी दर्शविली. या घटनेने नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्य हादरले आहे.