चांदवड/तळेगाव रोही : तालुक्यातील वाकी खुर्द येथील जवान शहाजी गोपाळा गोरडे (३४) यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. गोरडे यांचा सहा वर्षाचा मुलगा ओम याने अग्निडाग दिला. जम्मू-काश्मिरात कुपवाडानजीक बांधिपुरा जिल्ह्यात १२ हजार मीटर उंचीवर पेट्रोलिंग करीत असताना गोरडे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. गोरडे यांचे पार्थिव मुंबईमार्गे देवळाली येथे रविवारी रात्री उशिरा पोहोचले. त्यानंतर आज सकाळी त्यांना देवळाली येथून लासलगावमार्गे वाकी येथे आणण्यात आले. पार्थिव गावात येताच पत्नी रेखा (२८), आई जनाबाई (६२), वडील गोपाळा निंबा गोरडे (६५), मुलगी सिद्धी (८), मुलगा, ओम (६), दोन भाऊ व तीन बहिणी व इतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. घरातील वातावरण मनाला हेलावून टाकणारे होते. गोरडे यांचे पार्थिव वाकी खुर्द गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरी चौथऱ्यावर ठेवण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने जबतक चांदसूरज रहेगा शहीद शहाजी गोरडे तुम्हारा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमला. प्रारंभी २७ बटालियन भारतीय सैन्य दलाच्या वतीने नाईक सुभेदारदीपक भिडे, कॅप्टन समीर चव्हाण, सुभेदार राकेश रॉय, प्रदीप व सैन्य दलाचे अधिकारी, प्रांताधिकारी भीमराज दराडे,तहसीलदार शरद मंडलिक , जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे गोरडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे,तालुका भाजपा अध्यक्ष सुनील शेलार, पंचायत समिती सदस्य अनिल काळे, सरपंच विक्रम जगताप, अरुण देवढे, भाऊसाहेब जिरे, गटविकास अधिकारी धांडे, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहीते, लासलगावचे पोलीस निरीक्षक सोनवणे, चांगदेव देवढे, विलास शेळके, संजय पाटील, प्रकाश पाटील, शिवा सुरासे, रिओ आॅलम्पिक पटू दत्तु भोकनळ, महेश न्याहारकर,अंबादास केदारे, दत्तु वाघचौरे, तळेगावरोहीचे सरपंच शिवराम पाटील, शहाजी भोकनळ, सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. बी.व्ही. वाघ, वडाळीभोईचे अध्यक्ष वसंत अहेर,अशोक जाधव व मान्यवरांनी गोरडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. (वार्ताहर)
वाकी खुर्द येथील जवानावर अंत्यसंस्कार
By admin | Published: September 13, 2016 1:53 AM