खर्डे : परिसरातील शेरी (लो.) येथे रविवारी (दि.२९) रस्त्याअभावी अक्षरशः उभ्या पिकातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गेल्या काही महिन्यांपासून पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु शासन दरबारी घोंगडे भिजत पडल्याने रस्त्याचा प्रश्न कायम आहे.शेरी (लो.), ता. देवळा येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून जा-ये करण्यासाठी रस्ता नाही. गाव नकाशात याठिकाणी नैसर्गिक नाला असून, तो सध्या बंद आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी हा नाला खुला करण्यात यावा यासाठी देवळा तहसीलदारांकडे मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही. रस्त्याअभावी संबंधित शेतकऱ्यांना आपला शेतमाल एक ते दीड किलोमीटर अंतरावरून वाहून आणावा लागतो.
पावसाळ्याचे दिवस असल्याने या कामासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे येथील शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील पवार कुटुंबीयांतील वाळू पवार यांचे शनिवारी (दि.२८) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा काढण्यासाठी रस्ता नसल्याने ती अक्षरशः उभ्या पिकातून काढावी लागली. यापूर्वी हा रस्ता खुला करून मिळावा या मागणीसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. हा प्रश्न निकाली निघण्याची आस येथील शेतकऱ्यांना आहे. हा नाला प्रशासनाने रहदारीस खुला केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.