जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे निकम सेवेत होते. मंगळवार दि. ११ रोजी कर्तव्यावर असतांना त्यांचे निधन झाले. शुक्र वारी सकाळी त्यांचे पार्थिव खालप येथे आणल्यानंतर शिवाजी चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी देवळा तालुका व परिसरातील नागरीकांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शिवाजी चौकापासून ते अमरधामपर्यंतच्या मार्गावर सडा टाकून रांगोळी, तसेच फुलांनी सजावट करण्यात आली होती. निकम हे १४ वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. सन २०२० मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. आज सकाळी साडेदहा वाजता खालप येथील अमरधाममध्ये शासकीय इतमामात मानवंदना देऊन शोकाकुल वातावरणात निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात बंधू राजेंद्र, संजय, पत्नी अर्चना, मुलगा ओंकार, सत्यम असा परीवार आहे.यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, प्रांत अधिकारी सिद्धार्थ भंडारी, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, योगेश अहेर , डॉ. रमण लाल सुराणा, राजेंद्र देवरे, पंडीत निकम, सरपंच नाना सुर्यवंशी आदींनी श्रध्दांजली अर्पण केली. आर्टलरी स्कुल देवळाली कॅम्प १९०७ रेजिमेंटचे सुभेदार गोकुळ मतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवंदना दिली. सामाजिक तसेच शैक्षणिक संस्था, सेवानिवृत्त सैनिक तसेच तालुक्यात सुट्टीवर आलेल्या सैनिकांनी श्रध्दांजली अर्पण केली.अनेक सामाजिक संस्था, ठेकेदार व नागरिकांनी यावेळी निकम कुटूंबियांना आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. पुणे येथील अभियंता बाजीराव सुर्यवंशी यांनी ओंकार व सत्यम या दोन्ही मुलांच्या १२वीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे जाहीर केले. तर आमदार डॉ. राहुल अहेर यांनी विजय निकम यांचे खालप येथे स्मारक उभारण्यात येईल असे घोषित केले. यावेळी मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. जवान विजय निकम यांच्या निधनाने खालपसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
खालप येथे जवान विजय निकम यांच्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 5:55 PM